राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; १६ जागांसाठी १८ जूनला मतदान, २२ जूनला मतमोजणी.!!!

राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; १६ जागांसाठी १८ जूनला मतदान, २२ जूनला मतमोजणी.!!!

मुंबई, दि. १८ मे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १६ विधान परिषद जागांसाठी अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासोबतच एका जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागांमुळे विधान परिषदेचे संख्याबळ कमी झाले होते. आता निवडणुकीमुळे वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे संबंधित मतदारसंघांतील आमदारांचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणुका घेता आल्या नव्हत्या. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध झाल्याने निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. नियमांनुसार संबंधित मतदारसंघातील किमान ७५ टक्के मतदारसंख्या उपलब्ध असल्यास विधान परिषद निवडणूक घेता येते.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त जागेसाठीही पोटनिवडणूक होणार आहे.

राज्यातील पुणे, ठाणे, जळगाव, नाशिक, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद-जालना, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद-लातूर-बीड, सांगली-सातारा, परभणी-हिंगोली, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, नांदेड, अमरावती आणि यवतमाळ या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांच्या हालचालींनाही वेग आला आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार २५ मे रोजी अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून असून २ जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. ४ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होईल. त्यानंतर २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार असून २५ जूनपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार चुरस होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून काही मतदारसंघांत धक्कातंत्राची शक्यताही राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *