लग्नसमारंभात गावठी कट्टा! ताडे येथे युवक अटकेत; कासोदा पोलिसांची धडक कारवाई
कासोदा प्रतिनिधी :- शैलेश पांडे
लग्नाच्या हळदी कार्यक्रमात कमरेला गावठी पिस्तूल लावून मोकाट फिरणाऱ्या युवकाला अखेर कासोदा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दि. 03 मे 2026 रोजी ताडे येथे सुरू असलेल्या लग्नसमारंभात बाहेरगावाहून आलेला लखन प्रकाश वाघ (रा. परधाडे, ता. पाचोरा) हा युवक हळदी कार्यक्रमादरम्यान बँडवर बेधडक नाचत होता. याचवेळी काही नागरिकांच्या नजरेस त्याच्या कमरेला गावठी कट्टा असल्याचे आले. नागरिकांनी त्याला जाब विचारताच त्याने गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलिसांनी तात्काळ हालचाल करत शोधमोहीम सुरू केली. दोन दिवसांच्या पाठलागानंतर दि. 05 मे 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पुन्हा ताडे गावात शस्त्रासह फिरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने सापळा रचत त्याला जेरबंद केले.
अंगझडतीत आरोपीकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. संबंधित युवकाविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून कासोदा पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.





