श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

Spread the love
59 / 100 SEO Score

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेला भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह (रोजगार मोहीम) मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थिनींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे आयोजन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या संकल्पनेअंतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या सहकार्याने करण्यात आले.

महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि इतर सर्व शाखांतील द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष विद्यार्थिनींनी या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. एकूण ७७४ विद्यार्थिनींनी अर्ज केला. त्यापैकी ४०१ विद्यार्थिनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहिल्या. या उपक्रमात २० नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत विद्यार्थिनींना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. मुलाखतीदरम्यान विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने सहभाग घेत आपल्या कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण केले. संवादकौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांच्या जोरावर अनेक विद्यार्थिनींनी मुलाखतकारांवर छाप पाडली.

महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलने या उपक्रमाच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थिनींना पूर्वतयारी म्हणून रेझ्युमे लेखन, मुलाखत तंत्र, व्यक्तिमत्व विकास आणि संवादकौशल्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या तयारीमुळे विद्यार्थिनी अधिक आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोऱ्या गेल्या. या संदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी सांगितले की, “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या संकल्पनेअंतर्गत आयोजित प्लेसमेंट ड्राइव्हचे यशस्वी आयोजन अभिमानास्पद आहे. विद्यार्थिनींना केवळ शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नाही. त्यांना रोजगारक्षम बनवणे आणि करिअरला दिशा देणे ही आमची जबाबदारी आहे. स्पर्धात्मक युगात कौशल्य, आत्मविश्वास आणि प्रत्यक्ष अनुभव अत्यावश्यक आहेत. हा उपक्रम त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे.”

या यशस्वी उपक्रमामागे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शैलेश भगत, जिल्हा कौशल्य अधिकारी विद्या शिंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. शुभांगी कुलकर्णी, कला शाखा प्रमुख डॉ. सरिता कासरळकर, बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स विभागाचे समन्वयक प्रा. दत्तात्रय गावडे तसेच सहभागी प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.

मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींचा सहभाग, नामांकित कंपन्यांची उपस्थिती आणि सुयोग्य नियोजन यामुळे हा प्लेसमेंट ड्राइव्ह अत्यंत यशस्वी ठरला. आगामी काळात अशाच उपक्रमांद्वारे अधिकाधिक विद्यार्थिनींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top